
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये जाण्याच्या चर्चा राज्यभर रंगलेल्या असतानाच पुण्यातील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ‘‘वडिलांप्रमाणे जिद्दी आणि कष्टाळू असणारा माझा पुतण्या देवेंद्र एक दिवस नक्कीच देशाचा पंतप्रधान होईल,’’ असा दावा बाळासाहेब फडणवीस यांनी व्यक्त केला.
ईश्वरी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आणि लेखक संतोष गाजरे यांनी लिहिलेल्या ‘देवाभाऊ’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शाळा, महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देताना बाळासाहेब फडणवीस म्हणाले, जनसंघाच्या काळात गंगाधर फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्रभर पक्ष उभारणीसाठी केलेल्या संघर्षमय प्रकासाच्या अनेक आठकणी आजही ताज्या आहेत. गंगाधर फडणवीस यांची निष्ठा, जिद्द, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली बांधिलकी हेच गुण आज देवेंद्रमध्ये आहेत. एखादी गोष्टी ठरवली तर ती जिद्दीच्या जोरावर पूर्ण करायची हा देवेंद्रच्या अंगी असलेला महत्त्वाचा गुण आहे. त्यामुळे देवेंद्र भकिष्यात देशाचा पंतप्रधान होईल.



























































