महापालिकेच्या 473 वाहनचालकांची भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या परिवहन आणि घनकचरा व्यवस्थापन खात्यातील 473 वाहनचालकांची भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. या वाहनचालकांची रिक्त पदे भरण्यासाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेकडून गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

वाहनचालकांची पदे रिक्त असल्याने कार्यरत चालकांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असून त्यांना विविध आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याची तक्रार म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली होती. चालकाची समस्या सोडवण्यासाठी रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली होती. या संदर्भात महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभियंता विनायक भट यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीला म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष बाबा कदम व चिटणीस संजय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महेश गुरव, राजेश इंदुलकर, विशाल गायकवाड, रमेश सोसे, योगेश नगर, अभिषेक लमाणे, सत्यम सावंत, बबन रहाटे, महेंद्र चारणिया, उप-प्रमुख अभियंता अनघा पडियार, कार्यकारी अभियंता पुलकर्णी यांच्यासह संबंधित अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वाहनचालकांची नेमणूक

पालिकेने बी.ई.एस.टी.कडून 190 वाहनचालक उसनवारी पद्धतीने नियुक्त केले आहेत. या वाहकांची शहराच्या साफसफाई आणि घनकचरा वाहून नेण्यासाठी रिफ्युज कचरा गाडय़ांवर नेमणूक करण्यात येणार आहे. नवीन भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे चालक सेवा देणार आहेत. या प्रक्रियेत पालिकेच्या मूळ वाहनचालकांना परिवहन खात्यातील सेवा ज्येष्ठतेनुसार काम दिले जाणार आहे. तसेच प्रशासनाकडून नवीन आस्थापनेवर वाहनांची खरेदी करून सेवा पुरवली जाणार आहे.