
सायबर गुह्यातील पैसा वळता करून घेण्यासाठी बँकांमध्ये म्यूल खाते उघडून आर्थिक फसवणूक करणारी सात जणांची टोळी जेरबंद करण्यात मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांना यश मिळाले आहे.
सलमान पठाण व त्याचे साथीदार हे इंडियन ओव्हरसीज बँकेच्या बोरिवली व माहीम शाखेत म्यूल खात्यात सायबर गुह्यातील फसवणूक करून आलेली रक्कम काढण्यासाठी येणार असल्याची माहिती मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दोन्ही ठिकाणी सापळा रचला. दरम्यान, बोरिवली शाखेत सलमान पठाण व त्याचे दोन साथीदार आल्यानंतर त्यांनी एका धनादेशाद्वारे 10 लाखांची रोकड काढली व आणखी 10 लाख धनादेशाद्वारे काढण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी सलमान पठाण याचे स्वतःचे भाईंदर येथील के.जी.एन इंटरप्रायझेस आणि मीरा रोड येथील रिचा एंटरप्रायझेज या दोन्ही ठिकाणी छापे टाकले. त्या ठिकाणांहून आणखी चार जणांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून सातही जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 10 लाखांची रोकड, 16 मोबाईल, वेगवेगळ्या पंपन्यांचे 31 स्टॅम्प, 23 सिमकार्ड, 22 वेगवेगळ्या बँक खात्यांचे धनादेश, पैसे मोजण्याची मशीन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



























































