पालिकेच्या इनोव्हा क्रिस्टा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची नाराजी; सत्ताधाऱ्यांवर प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिका अधिकाऱयांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी इनोव्हा क्रिस्टा गाड्या खरेदी करणार आहे. असा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार होता. पण त्याआधी महागड्या गाड्यांवर होणाऱ्या उधळपट्टीमुळे मोठा वादंग उठला. सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका झाली. अशातचा थेट मुख्यमंत्र्यांनीच या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केल्याने सत्ताधाऱ्यांवर प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे.

महापालिकेने यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि विविध वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी एकूण 13 नवीन गाड्या खरेदी केल्या होत्या. यामध्ये महापौरांसाठी सुमारे 30 लाख रुपयांची इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड आणि इतर पदाधिकाऱ्यांसाठी 12 स्कॉर्पिओ एन गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. या संपूर्ण वाहन खरेदीवर सुमारे 2 कोटी 16 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. ही खरेदी प्रक्रिया महापालिकेवर प्रशासकीय राजवट असताना पूर्ण झाली होती. त्यानंतर म्हणजे अवघ्या सहा महिन्यांत पालिका प्रशासन महागड्या गाड्या खरेदी करण्याच्या तयारीत होते. तसा प्रस्ताव महापालिका आयुक्तांसमोर मंजुरीसाठी पाठवण्याची तयारी होती. मात्र त्यावर सर्व बाजूंनी जोरदार टीकेची झोड उठली. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हा प्रस्ताव तात्काळ रद्द करा. मुंबईकरांचा पैसा हा मुंबईकरांच्या सुविधांसाठी आणि विकासकामांसाठीच वापरला गेला पाहिजे,’ असे निर्देश दिल्याचे समजते.

या निर्देशांनंतर संबंधित प्रस्ताव रद्द करण्याच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता असून, प्रशासन पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती आहे.

सर्वांना सारख्याच गाड्या द्या, सभागृह नेत्यांची मागणी

महागड्या गाड्यांवरून वाद झाल्यानंतर सभागृह नेते गणेश खणकर यांनी नव्या गाड्या खरेदीचा असा कोणताच प्रस्ताव नसल्याचे घूमजाव केले होते. आता त्यांनी महापौर आणि पालिका आयुक्त वगळता सर्व वरिष्ठ अधिकारी आणि वैधानिक समित्यांच्या अधिकाऱ्यांना एकाच दर्जाच्या स्कॉर्पिओ गाड्या द्याव्यात, असे मत व्यक्त केले आहे.