
नेताजी रोड परिसरात विनस चौकाजवळील आशालोक इमारतीत मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. रहिवासी साखरझोपेत असतानाच ही घटना घडल्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील रहिवासी धुराने कोंडून अडकून पडले. परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी जिवाची बाजी लावून इमारतीचे ग्रील तोडून शिडीवरून उतरवत या रहिवाशांची सुटका केली. त्यामुळे मोठी जीवितहानी सुदैवाने टळली.
आशालोक इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर बॉक्सला अचानक आग लागली. या भडक्यात तळमजल्यावरील दुचाकी आणि चारचाकी खाक झाल्या. आगीच्या ज्वाला आणि काळ्या धुराचे लोट दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे रहिवाशांनी अक्षरशः आकांत केला. दाट धुरामुळे त्यांना श्वास घेणेही अवघड झाले. ही घटना कळताच अग्निशमन जवानांनी अत्यंत चपळाईने इमारतीचे दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील ग्रील तोडले. त्यानंतर शिडीने एक एक रहिवाशाला सुखरूपपणे बाहेर काढत सर्वांची सुटका केली.
४९ सदनिकांना आगीची झळ
आशालोक इमारतीत एकूण ४९ सदनिका असून त्यांना आगीची झळ बसली. आगीच्या घटनेनंतर संपूर्ण इमारतीचा वीजपुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडाला असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या आगीत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


























































