
शहरातील मुख्य कापड बाजार परिसरात सायंकाळी दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर बाजारपेठेत पळापळ उडाली असून, शहरात तणावाचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शहरातील कापड बाजार परिसरात नवीन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासंदर्भात गेल्या महिनाभरापासून व्यापारी आणि प्रशासन यांच्यात मतभेद सुरू होते. व्यापाऱयांनी या कामाला विरोध दर्शविला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी दोन गट आमनेसामने आले आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
अचानक घडलेल्या प्रकारामुळे बाजारपेठेत एकच गोंधळ उडाला. अनेक दुकानदारांनी दुकाने बंद केली, तर नागरिकांनी सुरक्षिततेसाठी धावाधाव केली. शहरात गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेकडून अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू आहे. अतिक्रमण करणाऱयांवर गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त ज्योती गाडे यांनी प्रशासनाला दिले आहेत. अशा पार्श्वभूमीवर कापड बाजारातील हा प्रकार घडल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली असून, परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.





























































