डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण- आधारवाडी तुरुंगात रमेश म्हात्रेसह पाच आरोपींची ओळख परेड पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाणप्रकरणी शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्यासह पाच आरोपी आधारवाडी जेलमध्ये आहेत. आज रमेश म्हात्रे याच्यासह अन्य चार आरोपींची तहसीलदारांच्या उपस्थितीत जेलमध्ये ओळख परेड पूर्ण करण्यात आली. मारहाण झालेले डॉ. वैभव साळुंखे यांनी रमेश म्हात्रेसह पाचही आरोपींना अचूक ओळखल्याची माहिती त्यांचे वकील अॅड. अभिनय अडसूळ यांनी दिली.

शास्त्रीनगर रुग्णालयात डॉ. साळुंखे यांना मारहाण आणि डॉ. सृष्टी बाविस्कर यांच्याशी धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींना जामीन नाकारताना तपासावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली होती. रमेश म्हात्रेच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उल्लेख करत साक्षीदारांवर दबाव येण्याची भीतीही न्यायालयात मांडण्यात आली होती. मारहाणीनंतर जीवाला धोका असल्याच्या भीतीने डॉ. साळुंखे यांनी डोंबिवली सोडून वाशिम जिल्ह्यातील मूळ गावी आश्रय घेतला होता.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांचा जबाब वाशिम येथे नोंदवण्यात आला. ओळख परेडसाठी त्यांना विशेष पोलीस संरक्षणात कल्याण येथे आणण्यात आले. ओळख परेडदरम्यान रमेश पवार, प्रमोद निकम, अक्षय कारंडे आणि साधना कारंडे यांनाही डॉ. साळुंखे यांनी ओळखले. तसेच तक्रारदार आणि आरोपींच्या आवाजाचे नमुने न्यायवैद्यक तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या ओळख परेडमुळे तपासातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याचे अॅड. अडसूळ यांनी सांगितले.