कोरिया मास्टर्स बॅडमिंटन – तन्वी, अश्मिता, रक्षिता विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरिया मास्टर्स सुपर-३०० बॅडमिंटन स्पर्धेत हिंदुस्थानच्या अनमोल खरब हिची झुंजार लढत अखेर अपुरी ठरली. व्हिएतनामच्या ऑलिम्पियन वू थी ट्रॅग हिच्याकडून तीन गेममध्ये पराभूत होत अनमोलला महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. मात्र, विद्यमान तैपेई ओपन विजेती तन्वी शर्मा, अश्मिता चालिहा व रक्षिता रामराज यांनी दमदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

जागतिक क्रमवारीत ४५व्या स्थानावर असलेल्या अनमोलने पहिल्या गेममध्ये चार गेम पॉइंट मिळवूनही संधी गमावली आणि २३-२१ असा गेम प्रतिस्पर्धीच्या नावावर गेला. त्यानंतर दुसरा गेम २१-१५ असा जिंकून तिने पुनरागमन केले. निर्णायक गेममध्ये ९-१९ अशी पिछाडीवर असतानाही सलग आठ गुणांची कमाई करत तिने थरार निर्माण केला. मात्र, अखेरीस वू थी ट्रॅगने २१-१८ अशी बाजी मारत विजय निश्चित केला.

दरम्यान, तन्वी शर्मा हिने हिंदुस्थानी खेळाडू श्रीयांशी वालिशेट्टी हिच्यावर २१-१६, १७-२१, २१-१३ असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. ५७ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात तन्वीने निर्णायक गेममध्ये पूर्ण वर्चस्व राखले.

हिंदुस्थानच्या अश्मिता चालिहा हिने दक्षिण कोरियाच्या किम मिन-जी हिचा २१-१७, २१-६ असा सहज पराभव केला, तर रक्षिता रामराज हिने जपानच्या मानामी सुईझू हिच्यावर २२-२०, २१-१० अशी मात करत पुढील फेरी गाठली.

मात्र, पाचव्या मानांकित ईशाराणी बरुआ आणि मानसी सिंह या हिंदुस्थानी खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला. ईशाराणीला दक्षिण कोरियाच्या किम मिन-सुन हिने, तर मानसीला चीनच्या हान कियान्शी हिने तीन गेममध्ये पराभूत केले.