
गुजरात राज्यात चांदिपुरा विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेल्या गंभीर व चिंताजनक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रात तत्काळ आणि प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
महापालिकेतील शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी यासंदर्भात गुरुवारी पालिका मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीला शिवसेना नगरसेवक व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बालकांमध्ये चांदिपुरा विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवावी, सर्व महापालिका रुग्णालयांना आवश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे व मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, संशयित रुग्णांचे तातडीने निदान व उपचार करण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करावी, तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी व्यापक माहिती अभियान राबवावे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.




























































