थोडक्यात – शिवसेनेची ‘गुड टच-बॅड टच’ मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेकडून बालकांच्या सुरक्षिततेसाठी ‘गुड टच- बॅड टच’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रतीक्षा नगरच्या शिवसेना शाखा क्र. 173 मध्ये 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 ते 7.30 या वेळेत ही मोहीम पार पडणार असून शिव विधी आणि न्याय सेनेच्या उपाध्यक्ष व कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या अॅड. स्वप्ना कोदे या बालकांमध्ये जनजागृती करत मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमानंतर सर्व बालकांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेने केले आहे.

पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशलचे आरक्षण फुल्ल

मुंबई – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत पश्चिम रेल्वे प्रशासनानेही गणपती स्पेशल गाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला. या गाडय़ांचे आरक्षण रविवारी सकाळी खुले झाले. मात्र पुढच्या काही मिनिटांतच अनेक गाडय़ांचे आरक्षण फुल्ल झाले आणि मोठया प्रमाणावर गणेशभक्तांचा कन्फर्म तिकीटाचा अपेक्षाभंग झाला. रेल्वेकडून आणखी गाडय़ा सोडल्या जाणार का, याकडे गणेशभक्तांचे लक्ष लागले आहे.

विद्यार्थिनीची आत्महत्या

नाशिक – राजीवनगर भागात इयत्ता आठवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. स्वरा सागर बागले असे तिचे नाव आहे. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तिने घरी एकटीच असताना पंख्याला गळफास घेतला. मावशी शीतल शिंदे घरी आल्यावर हा प्रकार उघड झाला. त्यांनी स्वराला उपचारासाठी प्रथम खासगी, त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांनी दिली. मात्र, आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही.