कला संचालकास हटवा, कला मंडळ बरखास्त करा; अन्यथा चित्रकला ग्रेड परीक्षेवर बहिष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कला संचालनालय सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट शिवाजी टर्मिनस, मुंबई यांच्यामार्फत संपूर्ण भारतात एक हजारापेक्षा जास्त केंद्रांवर चित्रकला ग्रेड परीक्षा घेतल्या जातात. मात्र या परीक्षा व्यवस्थापनासाठी कला संचलनालयाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

कला संचालकांनी 15 ऑगस्टपूर्वी कला शिक्षक महासंघाबरोबर बैठक घेऊन मागण्या निकाली काढाव्यात तसेच निष्क्रिय कला संचालकास तत्काळ पदावरून हटवून स्थापन करण्यात आलेले कला मंडळ तत्काळ बरखास्त करावे, अन्यथा देशभरातील चित्रकला ग्रेड परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात येईल. परीक्षेपूर्वी निर्णय न घेतल्यास राज्यातील 36 प्रमुख शहरात शासन, तंत्रशिक्षण मंत्री व कला संचालकांचा निषेध करण्यात येईल, असा इशारा कला शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी दिला आहे.

मागण्या

केंद्र परीक्षा व्यवस्थापन खर्च तसेच साहित्य खरेदी खर्च केंद्राकडे जमा फीमधून प्रतिविद्यार्थी 50 रुपयेप्रमाणे कपात करून उर्वरित रक्कम कला संचलनालयाकडे जमा करण्याबाबत तत्काळ आदेश निर्गमित करावे, विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कात कोणतीही वाढ न करता महासंघाने केलेल्या मागणीप्रमाणे परीक्षा मेहनताना मानधनात वाढ करून तत्काळ मंजूर करावी. परीक्षा व्यवस्थापन मेहनताना केंद्र संचालक किमान मानधन प्रतिदिन 1000 रुपये व 100 विद्यार्थ्यांच्या पुढील प्रति 100 च्या पटीत 400 रुपयेप्रमाणे वाढीव मानधन मिळावे. कलाशिक्षक प्रतिदिन 800 रुपये अशाप्रकारे सर्वांना मानधन वाढवून मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.