
हिंदुस्थानी संघात पुनरागमनाच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आपल्या निवड समितीचा पह्न आला तर मी पुनरागमन करण्यासाठी नक्की तयार असेन, असा संदेश देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यंदा आयपीएलमध्ये भेदक कामगिरीनंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याला 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पुन्हा हिंदुस्थानी संघात स्थान द्यावे, अशी जोरदार मागणी केल्यामुळे त्याच्या पुनरागमनाचा विषय पुन्हा चर्चेला आला आहे.
भुवनेश्वरबद्दल अनेक दिग्गज आपली भूमिका मांडत असले तरी त्याने आपली स्वतःची भूमिका अत्यंत शांत पण मोजक्या शब्दांत मांडली. तो म्हणाला, मी क्रिकेट खेळतो. कारण मला हा खेळ आवडतो. उत्तर प्रदेश टी-20 क्रिकेट स्पर्धा मी खेळायला आलोय ते कोणत्या पुढच्या स्तरावर पोहोचण्यासाठी नाही, तर क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी. देशांतर्गत मोठय़ा स्पर्धेतही आपले लक्ष्य फक्त संघाला विजय मिळवून देणे होते, निवडीसाठी खेळणे नव्हे, असेही त्याने स्पष्ट केले.
तथापि, हिंदुस्थानकडून पुन्हा संधी मिळाली तर काय कराल, असा प्रश्न विचारताच भुवनेश्वरने कोणतीही दुमत न ठेवता उत्तर दिले, कॉल आला तर मी का नकार देईन? मी पुनरागमनासाठी पूर्णपणे तयार आहे. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
या वर्षी आयपीएलमध्ये भुवनेश्वरने 16 सामन्यांत 28 विकेट्स घेत स्पर्धेतील दुसऱया क्रमांकाचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज म्हणून चमक दाखवली. 36 वर्षीय भुवनेश्वरने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 2022 मध्ये खेळला होता, पण त्याच्या अलीकडच्या फॉर्ममुळे हिंदुस्थानी संघात पुनरागमनाची शक्यता आता पूर्वीपेक्षा अधिक वास्तववादी वाटू लागली आहे.



























































