देव तारी त्याला कोण मारी! ट्रकची कारला जोरदार धडक, पाचही प्रवासी सुदैवाने बचावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यवतमाळमधील उमरखेड बायपास मार्गावर एका भरधाव ट्रकने एका कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर कारने तब्बल तीन पलट्या घेतल्या. मात्र, कार रस्त्यावर सरळ उभी राहिल्याने आणि पाचही जण सुखरूप बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात महागाव नगरपंचायतीचे नगरसेवक शैलेश कोपरकर यांच्यासह पाच जण सुदैवाने बचावले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश कोपरकर हे स्वतः कार चालवत सकाळी महागावहून उमरखेडकडे निघाले होते. त्यांच्यासोबत आणखी चार सहप्रवासी होते. उमरखेड बायपासवरील तुळशी हॉटेलजवळ कार आली असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली.

धडकेनंतर कार तीन वेळा पलटी झाली. मात्र, सुदैवाने कार रस्त्यावर सरळ उभी राहिली. कारमधील पाचही जण तत्काळ बाहेर पडले. अपघातानंतर समाधान राऊत यांनी रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराच्या मदतीने धडक देऊन पसार झालेल्या ट्रकचा पाठलाग केला. दरम्यान, उमरखेड पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर कारमधील सर्वांना उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात नेऊन तपासणी व उपचार करण्यात आले.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारला धडक देणाऱ्या ट्रकचा क्रमांक एमएच २६ बीडी ६२७५ असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, चालक योगेश हणमंत जामकर (२१), रा. डोंगरगाव, ता. जळकोट, जि. लातूर याची माहिती समोर आली आहे. अपघाताचा पुढील तपास उमरखेड पोलीस करीत आहेत.

कारच्या तीन पलट्या; तरीही पाचही सुखरूप!

भरधाव ट्रकच्या धडकेनंतर कारने तीन पलट्या घेतल्या. एवढ्या भीषण अपघातानंतरही कारमधील पाचही जण सुखरूप बचावले. त्यामुळे ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय आल्याची चर्चा घटनास्थळी होती.