
UPI पेमेंटवर कोणत्याही स्तरावर शुल्क आकारले जाऊ नये, अशी भूमिका काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली आहे. UPI ही सरकारने सुरू केलेली आणि अत्यंत यशस्वी ठरलेली व्यवस्था असून ती सध्या नागरिकांसाठी मोफत आहे. त्यामुळे UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्यास आपला ठाम विरोध असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
UPI पेमेंटबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “UPI साठी कोणत्याही स्तरावर शुल्क आकारले जाऊ नये. खरा मुद्दा असा आहे की, अमेरिकेतील Mastercard आणि Visa सारख्या क्रेडिट कार्ड कंपन्या व्यवहारांसाठी शुल्क आकारतात. मात्र, सरकारने सुरू केलेली हिंदुस्थानातील अत्यंत यशस्वी UPI व्यवस्था मोफत आहे.”
UPI मुळे अमेरिकन क्रेडिट कार्ड कंपन्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. UPI ही या कंपन्यांसाठी मोठी स्पर्धा ठरत असल्याने अमेरिकेकडून हिंदुस्थानवर UPI व्यवहारांसाठी शुल्क आकारण्याचा दबाव आणला जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. “त्यांच्या कंपन्या टिकून राहाव्यात यासाठी हिंदुस्थाननेही UPI वर शुल्क आकारावे, असा दबाव अमेरिकेकडून येत आहे. माझा याला ठाम विरोध आहे,” असे ते म्हणाले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सामान्य नागरिकांना UPI व्यवहारांसाठी शुल्क द्यावे लागणार नाही, असे म्हटले आहे. मात्र, चव्हाण यांनी त्यांच्या या भूमिकेवरही आक्षेप घेतला. “सामान्य नागरिकांना शुल्क द्यावे लागणार नाही, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे. जर व्यापाऱ्यांकडून MDR म्हणजेच Merchant Discount Rate आकारला गेला, तर व्यापारी हा खर्च सामान्य ग्राहकांकडून वसूल करतील,” असे चव्हाण यांनी सांगितले.
VIDEO | Mumbai: Former Maharashtra CM Prithviraj Chavan, speaking on UPI payments, says, “It is absolutely clear to me that no payment should be charged at any level for UPI. The real issue here is that American credit card companies such as Mastercard and Visa charge fees, while… pic.twitter.com/3VA6yDwlmD
— Press Trust of India (@PTI_News) August 11, 2026






























































