
हिंदुस्थानचा स्टायलिश फलंदाज अजिंक्य रहाणेने काही दिवसांपूर्वीच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती; पण त्यानंतर आता अजिंक्य नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. अजिंक्य हा क्रिकेटच्या मैदानावरून समालोचन कक्षात आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे. 15 ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणाऱ्या हिंदुस्थान आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत रहाणे समालोचक म्हणून पदार्पण करणार आहे. या मालिकेसाठी तो सोनी स्पोर्ट्स नेटवर्प आणि सोनी लिव्हच्या समालोचन पॅनेलमध्ये सामील झाला आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पणानंतर जवळपास 18 वर्षांच्या दमदार कारकिर्दीनंतर अजिंक्य आता प्रथमच समालोचनाची सूत्रे हाती घेणार आहे. त्याने भारतासाठी 85 कसोटी सामने खेळले असून, 38.46 च्या सरासरीने 5,077 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 12 शतके आणि 26 अर्धशतके आहेत.
अजिंक्य समालोचनाबद्दल काय म्हणाला…
आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना रहाणे म्हणाला, ‘हिंदुस्थानच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान सोनी स्पोर्टस नेटवर्पसोबत कसोटी समालोचनात पदार्पण करण्यास मी खूप उत्सुक आहे. कसोटी क्रिकेट हा आपल्या खेळाचा सर्वोत्तम प्रकार आहे. एवढी वर्षे हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आता या खेळाकडे एका वेगळय़ा दृष्टिकोनातून पाहणे हा एक सन्मान आहे. मी चाहत्यांना खेळातील बारकावे, रणनीती आणि महत्त्वाच्या निर्णयांबद्दल सखोल माहिती देण्याचा प्रयत्न करेन.’
ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक मालिका विजयाचा नायक
रहाणेची कसोटी कारकीर्द अनेक संस्मरणीय परदेशी विजयांनी भरलेली आहे. 2020-21च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हिंदुस्थानने जिंकलेल्या ऐतिहासिक आणि संस्मरणीय कसोटी मालिकांमध्ये तो प्रभारी कर्णधारही होता. भारताच्या सर्वात विश्वासार्ह मधल्या फळीतील फलंदाजांपैकी एक असलेला रहाणे आता समालोचनाच्या माध्यमातून आपला विस्तृत आंतरराष्ट्रीय अनुभव चाहत्यांपर्यंत पोहोचवणार आहे.

























































