
15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी मंत्रालयात घातपात घडवण्याचा धमकीचा पह्न आला असून सुरक्षेच्या दृष्टीने मंत्रालयाची सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, मंत्रालय पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कर्मचाऱयांना विशेष सूचना जारी केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज रात्री उशिरा ‘फोर्स वन’ आणि ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ कमांडोंचे मॉकड्रील करण्यात आले.
सुरक्षेचा उपाय म्हणून 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी कार्यालये बंद झाल्यानंतर मंत्रालयातील सर्व दालने, खिडक्या आणि दरवाजे व्यवस्थित बंद करण्याचे तसेच कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास तत्काळ ‘पोलीस नियंत्रण कक्षा’शी संपर्क साधण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज रात्री दहा वाजता फोर्स वन आणि क्विक रिस्पॉन्स टीमचे कमांडो शस्त्र घेऊन अचानक मंत्रालयात घुसले आणि संपूर्ण मंत्रालयाच्या इमारतीचा ताबा घेतला. मंत्रालयाचा कोपरानकोपरा तपासून मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. मॉकड्रीलची कल्पना नसल्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडाली होती.






























































