
घटस्फोट करणे हे ट्रस्टचे काम नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत बृहन्मुंबई विभागाचे धर्मादाय उपायुक्त डॉ. राहुल जे. चव्हाण यांनी एका मुस्लिम संस्थेची नोंदणी रद्द केली. अशी चुकीची कामे या संस्थेने यापुढे करू नये, असेही उपायुक्त डॉ. चव्हाण यांनी बजावले आहे.
मोहक्कमा-ए-शरिया दारुल कझा रहमानिया, असे या संस्थेचे नाव आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 च्या कलम 22(3ए)(ई) अंतर्गत रिजवाना अफजल शेख यांनी ट्रस्टची नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार उपायुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीत फस्ख-ए-निकाह (घटस्फोट) करण्यासारखी चुकीची कामे ट्रस्ट करत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच नियमानुसार या ट्रस्टचा कारभार चालत नव्हता. तेव्हा जनहितासाठी ट्रस्टची नोंदणी रद्द केली जात आहे, असा निकाल उपायुक्त डॉ. चव्हाण यांनी दिला.
ही ट्रस्ट धर्मादाय स्वरूपात न मोडणाऱ्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचे चौकशीत आढळले. वारंवार बोलावूनही विश्वस्त प्राधिकरणासमोर उपस्थित राहिले नाहीत. योग्य पुरावे व कागदपत्रे सादर करण्यात संस्था अपयशी ठरली आहे. आवश्यक लेखापरीक्षण अहवाल तसेच बदल अहवाल वेळोवेळी त्यांनी सादर केले नाहीत, असेही उपायुक्तांनी आदेशात नमूद केले.
महिलांच्या अधिकारांवर गदा
ट्रस्टची अशी बेकायदा कामे महिलांवर व त्यांच्या अधिकारांवर गंभीर परिणाम करतात. अशा संस्थांना वेसण घालण्यासाठी त्यांची नोंदणी रद्द करणे आवश्यकच आहे, असे निरीक्षण उपायुक्तांनी नोंदवले.
महिनाभरात मूळ नोंदणी प्रमाणपत्र जमा करा
ट्रस्टच्या विश्वस्तांना ट्रस्ट नोंदणी प्रमाणपत्रासह संबंधित मूळ कागदपत्रे एका महिन्यात सार्वजनिक न्यास, मुंबई नोंदणी कार्यालयात जमा करावीत, असे आदेशही उपायुक्तांनी दिले आहेत.






























































