
देशभरात 80 व्या स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी सुरू असताना हिंगोलीत चांगलेच मानापमान नाटय़ पहायला मिळाले. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यात ‘तुम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना एका बाजूला खाली थांबा म्हणता आणि स्वत: ध्वजारोहण करायला जाता; हा कोणता प्रोटोकॉल आहे?’ असा संताप व्यक्त करत भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांनी यांनी आगपखड केली. यामध्ये पालकमंत्री नरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जि.प.चे सीईओ विवेक गायकवाड यांच्यासोबत चांगलीच खडाजंगी केली. बैठक व्यवस्थेवरून मानापमान नाट्य रंगल्यामुळे काहीवेळ गोंधळ उडाला होता.
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी खासदार वडकुते यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींना एका बाजूस खाली त्यांच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. वडकुते यांनी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी व सीईओंना जाब विचारत चांगलीच आगपाखड केली.




























































