
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या घडामोडींमुळे सोने-चांदीचे दर दररोज वर खाली होत आहेत. सध्या 24 कॅरेटचे सोने 1 लाख 55 हजार रुपये प्रति तोळा (10 ग्रॅम), तर चांदीचे दर प्रति किलो 2 लाख 35 हजारांच्या आसपास आहेत. यात रोज बदल होत असले तरी सोने-चांदी सध्यातरी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. अर्थात आगामी काळात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सोने 3 लाख प्रति तोळा, तर चांदी 6 लाख प्रति किलो होणार असल्याचे भाकित ‘रिच डॅड पुअर डॅड’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि दिग्गज गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी यांनी केले आहे.
जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज लवकरच 40 ट्रिलियन डॉलरच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचेल, अशी भीतीही कियोसाकी यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर बँकेत रोख रक्कम ठेवणे हे सर्वात मोठे नुकसान ठरेल, असे सांगत त्यांनी गुंतवणूकदारांना सोने आणि चांदी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
$40 TRILLION US NATIONAL soon!!
Q: What are you doing about it?
Friends who are much smarter than me, such as Jim Rickards are predicting $200 an ounce for silver and $10,000 an ounce gold soon.
Of the two…. I think silver is the best choice in August 2026.
Q: What do you…
— Robert Kiyosaki (@theRealKiyosaki) August 15, 2026
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत कियोसाकी यांनी अमेरिकेच्या वाढत्या कर्जाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. अमेरिकन बाँड्स घसरत असून देशावरील कर्ज 39 ट्रिलियन डॉलरवरून आता थेट 40 ट्रिलियन डॉलरच्या दिशेने वेगाने वाढत आहे. जे लोक रोख रक्कम बचत करतात, त्यांचे सर्वात जास्त नुकसान होते, असा पुनरुच्चार त्यांनी केला. पैसे बँकेत पडून ठेवण्याऐवजी योग्य मालमत्तेत गुंतवणूक करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कियोसाकी यांच्या मते, येत्या काळात मौल्यवान धातूंच्या किमतीत ऐतिहासिक तेजी पाहायला मिळू शकते. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जिम रिकार्ड्स यांच्या हवाल्याने त्यांनी सांगितले की, चांदीचा दर प्रति औंस 200 डॉलर, तर सोन्याचा भाव प्रति औंस 10 हजार डॉलरच्या पार जाऊ शकतो, असे ते म्हणाले.
सोने आणि चांदी या दोन्ही पर्यायांपैकी कियोसाकी यांनी चांदीला अधिक पसंती दिली आहे. ऑगस्ट 2026 मधील गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून चांदी हा अधिक फायदेशीर आणि मजबूत पर्याय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच सध्याच्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोने, चांदी आणि डिजिटल मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणे हाच सुरक्षित मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.





























































