
अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्य मिळवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या, ग्रीन कार्डच्या मंजुरीत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. असाधारण कौशल्य असलेल्या कामगारांसाठी असलेल्या EB-1A ग्रीन कार्डच्या मंजुरीचे प्रमाण आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या दोन तिमाहींत सुमारे 35 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. याचा सर्वाधिक परिणाम हिंदुस्थानातील अर्जदारांवर झाला आहे.
‘बाउंडलेस इमिग्रेशन’ने अमेरिकेच्या नागरिकत्व आणि स्थलांतर सेवा विभागाकडे (USCIS) दाखल झालेल्या अर्जांच्या आधारे ही माहिती दिली आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये हिंदुस्थानी अर्जदारांच्या EB-1A अर्जांना मंजुरी मिळण्याचे प्रमाण 49.1 टक्के होते. मात्र, आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या दोन तिमाहींत हे प्रमाण 35 टक्क्यांपर्यंत घसरले आहे.
‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार,आकडेवारीनुसार, FY25 मध्ये हिंदुस्थानींनी एकूण 14, 250 अर्ज दाखल केले. त्यापैकी 6 हजार 993 अर्ज मंजूर, तर 1 हजार 474 अर्ज नाकारण्यात आले. FY26च्या पहिल्या दोन तिमाहींत हिंदुस्थानींकडून 7 हजार 316 अर्ज दाखल करण्यात आले. यापैकी 2, 571 अर्ज मंजूर , तर 1, 131 अर्ज नाकारण्यात आले.
ही घट विशेषतः हिंदुस्थानातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगारांमध्ये दिसून येत असल्याचे स्थलांतर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. EB-1A श्रेणीत मोठ्या संख्येने अर्ज करणाऱ्या हिंदुस्थानींनंतर चिनी अर्जदारांचा क्रमांक लागतो. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाच्या काळात स्थलांतर धोरणे अधिक कठोर होत असताना EB-1A मंजुरीतील ही घट दिसून येत आहे. ‘गॅनी लॉ ग्रुप’चे वरिष्ठ वकील जोएल यानोविच यांच्या मते, कायद्यात कोणताही बदल झालेला नसतानाही अर्ज तपासणाऱ्या अधिकाऱ्यांकडून अर्जदारांसाठी अधिक कठोर आणि अवास्तव निकष लावले जात असल्याचे दिसते.
‘बाउंडलेस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जिओ वांग यांच्या मते, USCISच्या दहा निकषांपैकी केवळ तीन निकष पूर्ण करणे आता पुरेसे ठरत नाही. प्रतिष्ठित संस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणे किंवा उच्च वेतन मिळवणे यांसारख्या बाबी आता प्राथमिक निकष मानल्या जात आहेत. त्यासोबत आणखी एखादा उच्च-गुणवत्तेचा निकष पूर्ण करणे आवश्यक ठरत आहे.
अमेरिकेतील EB-2 आणि EB-3 श्रेणीतील प्रलंबित अर्जांचा बॅकलॉग 15 वर्षांपर्यंत वाढल्याने, आता हिंदुस्थानी नागरिक पर्यायी मार्गांचा विचार करत आहेत. यामध्ये EB-1C हा एक पर्याय आहे. या श्रेणीसाठी व्यवस्थापक किंवा कार्यकारी अधिकारी म्हणून परदेशात किमान एक वर्ष काम करण्याचा मार्ग उपलब्ध आहे. याशिवाय गुंतवणुकीवर आधारित EB-5 मार्गाकडेही, हिंदुस्थानी अर्जदारांचा कल वाढत आहे. तसेच कॅनडा आणि ब्रिटनमध्ये प्रतिभावान व्यक्तींसाठी उपलब्ध असलेल्या व्हिसा पर्यायांचाही हिंदुस्थानीयांकडून विचार केला जात आहे.





























































