
संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे सुवारेवाडी येथे एका साठ वर्षीय महिलेने घरात घुसलेल्या बिबट्याशी तब्बल अर्धा तास थरारक झुंज दिल्याची घटना घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात प्रतिभा प्रकाश दळवी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली. पहाटेच्या वेळी कोंबड्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने एका बिबट्याने दळवी यांच्या घरात प्रवेश केला. बिबट्याने घरातील कोंबड्या फस्त केल्या आणि त्यानंतर घरात असलेल्या प्रतिभा दळवी यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या अनपेक्षित हल्ल्याने न डगमगता प्रतिभा यांनी स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी बिबट्याशी जोरदार संघर्ष सुरू केला. सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ हा जीवघेणा थरार सुरू होता. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रतिभा यांनी कमालीचे धाडस आणि समयसूचकता दाखवली. संघर्ष करत असतानाच त्यांनी घराचा पुढील दरवाजा उघडला. रस्ता मोकळा मिळताच बिबट्याने घरातून थेट जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
या भयानक हल्ल्यात प्रतिभा दळवी या गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी देवरुख येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना पुढील आणि अधिक चांगल्या उपचारांसाठी रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी बिबट्याशी दिलेल्या या असामान्य लढतीचे आणि धाडसाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.




























































