
मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानात लपून बसलेल्या ‘लष्कर-ए-तोयबा’चा संस्थापक हाफिज सईद, झकी-उर-रहमान लखवी यांच्यासह सहा फरार आरोपींवर त्यांच्या अनुपस्थितीत खटला चालवला जाणार आहे. याबाबतचा अहवाल सरकारने न्यायालयात सादर केला असून याप्रकरणी मुंबई पोलिसांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
26/11 प्रकरणातील खटल्यावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्यासमोर आज शुक्रवारी सुनावणी घेण्यात आली. मुंबई पोलिसांच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी फरार आरोपींविरोधात जुलैमध्ये जारी करण्यात आलेल्या जाहीरनाम्याच्या आदेशासंदर्भातील अंतरिम अहवाल सादर केला. फरार आरोपींवर त्यांच्या अनुपस्थितीत खटला चालवण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी कारवाई करण्यात आली.
न्यायालयाने अधिकाऱ्यांना इंटरपोलमार्फत सहा फरार पाकिस्तानी नागरिकांना औपचारिक कायदेशीर नोटीस बजावण्यासाठी वेळ दिला असून, या प्रकरणाची सुनावणी 17 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.


























































