
>> विजया पंडित
मानवी जिज्ञासा, संशोधनवृत्ती आणि वैज्ञानिक धाडसाचे जिवंत प्रतीक असलेले अमेरिकेच्या नासाचे व्हॉयेजर-1 हे यान आंतरतारकीय अवकाशातील जवळपास अर्धशतकाचा प्रवास पूर्ण करून लवकरच एक ऐतिहासिक टप्पा गाठणार आहे.
मानवाने अंतराळाचा शोध घेण्याचा प्रवास सुरू केल्यापासून अनेक मोहिमा इतिहासात अजरामर झाल्या आहेत. त्यापैकी नासाच्या व्हॉयेजर-1 या अंतराळयानाचे स्थान सर्वात वेगळे आहे. जवळपास 50 वर्षांपूर्वी प्रक्षेपित झालेले हे छोटेसे अंतराळयान आजही विश्वाच्या अथांग अवकाशात आपला प्रवास सुरू ठेवत आहे. पृथ्वीपासून सर्वाधिक दूर गेलेली मानवनिर्मित वस्तू म्हणून व्हॉयेजर-1 ने इतिहास घडवला आहे. आता ते आणखी एका महत्त्वपूर्ण टप्प्याच्या उंबरठय़ावर उभे आहे. 18 नोव्हेंबर 2026 रोजी ते पृथ्वीपासून तब्बल 1 प्रकाशदिवस इतक्या अंतरावर पोहोचणार आहे. हा टप्पा केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर मानवाच्या जिज्ञासेचा, धैर्याचा आणि ज्ञानलालसेचा विजय मानला जात आहे.
व्हॉयेजर-1 चे प्रक्षेपण 1977 मध्ये झाले. त्याचे प्राथमिक उद्दिष्ट गुरू आणि शनी या महाग्रहांचा अभ्यास करणे हे होते. 1979 मध्ये त्याने गुरू ग्रहाजवळून, तर 1980 मध्ये शनीजवळून यशस्वी उड्डाण केले. या दोन्ही ग्रहांचे, त्यांच्या उपग्रहांचे आणि कडय़ांचे अत्यंत मौल्यवान छायाचित्र व वैज्ञानिक माहिती त्याने पृथ्वीवर पाठवली. मूळ मोहीम पूर्ण झाल्यानंतरही त्याचा प्रवास थांबला नाही. सूर्याच्या प्रभावक्षेत्राबाहेर जाऊन आंतरतारकीय अवकाशाचा अभ्यास करण्यासाठी त्याला पुढे पाठवण्यात आले.
व्हॉयेजर-1 आणि व्हॉयेजर-2 या दोन्ही मोहिमांनी मानवाच्या अंतराळज्ञानात आमूलाग्र भर घातली. या यानांनी गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून या चार महाकाय ग्रहांचे अभूतपूर्व छायाचित्रण केले. गुरूच्या उपग्रहावर पृथ्वीबाहेरील पहिल्या सक्रिय ज्वालामुखींचा शोध याच मोहिमेमुळे लागला. युरोपा या उपग्रहाच्या बर्फाच्छादित पृष्ठभागाखाली द्रवरूप महासागर असण्याची पहिली चिन्हेही याच यानांनी शोधून काढली. त्याशिवाय या मोहिमांमुळे 22 नवीन उपग्रहांचा शोध लागला आणि गुरू, युरेनस व नेपच्यूनच्या गुंतागुंतीच्या कडय़ा प्रथमच स्पष्टपणे पाहता आल्या. या सर्व शोधांनी ग्रहविज्ञानाला नवे परिमाण दिले.
25 ऑगस्ट 2012 रोजी व्हॉयेजर-1 ने सूर्याभोवती असलेल्या हेलिओस्फिअरचे संरक्षणकवच ओलांडून आंतरतारकीय अवकाशात प्रवेश केला. हा टप्पा गाठणारे ते पहिले मानवनिर्मित अंतराळयान ठरले. त्यानंतर 5 नोव्हेंबर 2018 रोजी व्हॉयेजर-2 नेही हा विक्रम केला. आज ही दोन्ही याने दोन तारांमधील विरळ अवकाशातून प्रवास करत असून तेथील चुंबकीय क्षेत्रे, विद्युतभारित कण आणि प्लाझ्मा यांचा अभ्यास करीत आहेत. पृथ्वीपासून अब्जावधी किलोमीटर दूर असूनही ही याने अजूनही संदेश पाठवत आहेत, ही अभियांत्रिकीची विलक्षण कामगिरी आहे.
मात्र प्रत्येक यंत्राचे आयुष्य मर्यादित असते. व्हॉयेजर-1 ला ऊर्जा मिळते ती प्लुटोनियमवर चालणाऱया रेडिओसमस्थानिक ऊर्जानिर्मिती यंत्रणेतून. कालांतराने या ऊर्जेची क्षमता कमी होत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत नासाने त्यावरील अनेक वैज्ञानिक उपकरणे एकामागोमाग बंद केली आहेत. सध्या केवळ 2 उपकरणे कार्यरत आहेत. त्यामध्ये चुंबकीय क्षेत्र मोजणारे उपकरण आणि प्लाझ्मा तरंगांचा अभ्यास करणारी प्रणाली यांचा समावेश आहे. या उपकरणांच्या सहाय्याने आंतरतारकीय अवकाशातील सूक्ष्म विद्युत चुंबकीय हालचालींची नोंद केली जात आहे. नासाच्या मते, 2030 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत व्हॉयेजर-1 कडून संदेश मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऊर्जा इतकी कमी होईल की पृथ्वीशी संपर्क तुटेल.
तथापि, संपर्क तुटला म्हणजे मोहीम संपली असे होणार नाही. कारण व्हॉयेजर-1 वर मानवजातीने विश्वासाठी ठेवलेला एक अमूल्य ठेवा आहे. या अंतराळयानावर बसविण्यात आलेली गोल्डन रेकॉर्ड ही सोन्याचा मुलामा दिलेली तांब्याची ध्वनिमुद्रिका म्हणजे पृथ्वीवरील जीवनाचा परिचय करून देणारा संदेश आहे. या गोल्डन रेकॉर्डमध्ये 50 हून अधिक भाषांमधील शुभेच्छा संदेश ध्वनिमुद्रित करण्यात आले आहेत. त्यामध्ये हिंदीसह भारतातील प्रमुख भाषांचाही समावेश आहे. भारताच्या महान शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांनी गायलेली प्रसिद्ध ठुमरी ‘जात कहाँ हो’ याचाही या ध्वनिमुद्रिकेत समावेश करण्यात आला आहे. हा अमूल्य सांस्कृतिक ठेवा आजही विश्वात प्रवास करत आहे.
व्हॉयेजर-1 ची कहाणी मानवाच्या अमर्याद जिज्ञासेचे, धाडसाचे आणि भविष्यावरील विश्वासाचे प्रतीक आहे. या मोहिमेने एक गोष्ट सिद्ध केली आहे की, ज्ञानाचा शोध हा सीमाविरहित असतो. व्हॉयेजर-1 आजही शांतपणे विश्वाच्या अथांग अंधारातून प्रवास करत आहे. मानवाच्या वैज्ञानिक प्रगतीचा आणि विश्वाशी संवाद साधण्याच्या चिरंतन आकांक्षेचा हा प्रवास कायम स्मरणात राहील.



























































