
हिंदुस्थानच्या हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र बहावलपूर येथे जैश-ए-मोहम्मदचा तळ पुन्हा उभारण्यात आला आहे. या तळाचे फार मोठे नुकसान झाले होते. पाकिस्तान सरकारने हा तळ पुन्हा उभारण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पैसा ‘जैश’ला पुरवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर 7-8 मे 2025 रोजी हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले होते. त्यापैकी बहावलपूर येथे जैशचा महत्त्वाचा तळ होता. दहशतवाद्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जायचे. तेथील इमारतींचे मोठे नुकसान झाले होते. मात्र आता हा तळ पाकिस्तान सरकारने दिलेल्या पैशांच्या जोरावर पुन्हा उभारण्यात आला आहे. मरकज सुभानअल्लाचे घुमट पुन्हा बांधण्यात आले असून त्यावर नवे संगमरवर आणि प्लॅस्टर लावण्यात आले आहे. इमारतीच्या भिंतींची डागडुजी करण्यात आली असून संपूर्ण इमारत नव्याने रंगविली आहे.
मरकज सुभान अल्ला हे ठिकाण हिंदुस्थान आणि पाकिस्तान सीमेपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी ‘जैश’कडून नव्या दहशतवाद्यांची भरती आणि ब्रेनवॉश करण्यात येत होते. सुमारे 18 एकर परिसरात हा तळ आहे. या ठिकाणी प्रशिक्षित दहशतवाद्यांचा पठाणकोट हवाई तळावर 2016मध्ये झालेला हल्ला तसेच 2019च्या पुलवामा आत्मघाती हल्ल्यात सहभाग होता.
पाकिस्तान सरकारने दिले 25 कोटी
प्राप्त माहितीनुसार पाकिस्तानी सरकारने दहशतवादी तळाच्या दुरुस्तीसाठी 25 कोटी पाकिस्तानी रुपये दिले आहेत. मदरसा व दहशतवाद्यांच्या राहण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इमारती नव्याने बांधण्यात येत आहेत. दहशतवादी तळाच्या आतील भाग पूर्णपणे मोडकळीस आला होता. त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे.

























































