
ठाणे शहरातील वाढत्या वाहतूककोंडीमुळे ठाणेकरांची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच बेशिस्त वाहनचालकांमुळे या कोंडीत भर पडत असून अशा चालकांना शिस्त लावण्यासाठी ठाणे पोलीस इन ॲक्शन आले आहेत. वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या सहभागातून मोठी धडक मोहीम हाती घेतली असून वेगवेगळ्या उपविभागांसाठी १८ विशेष व्हॉट्सॲप क्रमांक दिले आहेत. याद्वारे नागरिकांना आपल्या भागातील ट्रॅफिकचे थेट व्हिडिओ या व्हॉट्सॲपवर पाठवता येणार आहेत. त्यानंतर काही वेळात पोलीस घटनास्थळी धाव घेऊन वाहतुकीचा जांगडगुत्ता सोडवणार आहेत.
ठाण्याची वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध आणि सुरळीत करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी सोशल मीडियाची कास धरली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नागरिकांना थेट व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तक्रार नोंदविता येणार असून तक्रारीसोबत पाठवलेल्या छायाचित्रांच्या आधारे पोलिसांकडून तत्काळ पडताळणी करून कारवाई केली जाणार आहे. रॉंग साईड वाहन चालविणे, ट्रिपल सीट, फॅन्सी अथवा नियमबाह्य नंबर प्लेट, टिंटेड ग्लास, नो-पार्किंगमध्ये वाहन उभे करणे, डबल पार्किंग किंवा वाहतुकीस अडथळा यांसारख्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास त्याची माहिती व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठविता येणार आहे.
व्हॉट्सॲप क्रमांक
* ठाणे नगर – ८६५५६५४१७१
* राबोडी – ८६५५६५४१७२
* नौपाडा – ८६५५६५४१७३
* कळवा – ८६५५६५४१७४
* मुंब्रा – ८६५५६५४१७५
* कोपरी – ८६५५६५४१७६
* वागळे – ८६५५६५४१७७
* कापूरबावडी – ८६५५६५४१७८
* वर्तकनगर (वडवली) – ८६५५६५४१७९
* भिवंडी – ८६५५६५४१८०
* कोनगाव – ८६५५६५४१८१
* नारपोली – ८६५५६५४१८२
* कल्याण – ८६५५६५४१८३
* डोंबिवली – ८६५५६५४१८४
* कोलशेवाडी – ८६५५६५४१८५
* उल्हासनगर – ८६५५६५४१८६
* विठ्ठलवाडी – ८६५५६५४१८७
* अंबरनाथ – ८६५५६५४१८८





























































