गुरमीत राम रहीमला पुन्हा 21 दिवसांची फर्लो मंजूर; आतापर्यंत 17 वेळा आला तुरुंगाबाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन महिला शिष्यांवर बलात्कार केल्या प्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह याला पुन्हा एकदा 21 दिवसांची फर्लो (रजा) मंजूर करण्यात आली आहे.

हरियाणातील रोहतक येथील सुनारिया तुरुंगात बंद असलेल्या राम रहीमला तुरुंगातून बाहेर पडण्यास आणि सिरसा येथील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तो थेट सिरसा येथील आश्रमात जाणार आहे. या 21 दिवसांच्या फर्लोसह राम रहीमला आतापर्यंत तब्बल 17 वेळा तुरुंगातून बाहेर सोडण्यात आले आहे.

यापूर्वीच्या बहुतांश तात्पुरत्या सुटकेदरम्यान राम रहीमला उत्तर प्रदेशातील बागपत येथील बरनावा आश्रमात पाठवण्यात येत होते. मात्र, अलीकडच्या काळात त्याला सिरसा मुख्यालयात राहण्याची परवानगी दिली जात असून, या मुख्यालयाला दिलेली ही त्याची सलग तिसरी भेट असेल.

2017 मध्ये झाली होती शिक्षा
सिरसा येथील डेरा सच्चा सौदा मुख्यालयात दोन महिला शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 2017 मध्ये राम रहीमला दोषी ठरवले होते. न्यायालयाने त्याला दोन्ही प्रकरणांमध्ये प्रत्येकी 10-10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या दोन्ही शिक्षा एकापाठोपाठ एक (consecutively) भोगायच्या असून, पहिली शिक्षा संपल्यानंतर दुसरी सुरू होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.