रशियातील अमूर गॅस केमिकल प्रकल्पात भीषण आग; 6 चिनी नागरिकांसह 7 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियाच्या पूर्वेकडील अमूर प्रांतातील एका गॅस केमिकल प्रकल्पात मंगळवारी भीषण आग लागली. या दुर्घटनेत ६ चिनी नागरिकांसह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अद्याप ९ जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. रॉयटर्सने कंपनीच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत १५२ जण जखमी झाले असून ३६ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गंभीर जखमी झालेल्या कामगारांना रशियातील इतर विशेष रुग्णालयात हलवण्यासाठी आपत्कालीन सेवांचे विमान तैनात करण्यात आले आहे. अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले असल्याचे कंपनीने आपल्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलवर स्पष्ट केले.

हा प्रकल्प रशियन पेट्रोकेमिकल कंपनी ‘सिबूर’ (Sibur) आणि चीनची आघाडीची तेल व वायू कंपनी ‘सिनोपेक’ (Sinopec) यांचा संयुक्त प्रोजेक्ट आहे. या भव्य प्रकल्पाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार होते. या कामासाठी मोठ्या प्रमाणावर परदेशी, विशेषतः चिनी कामगारांची मदत घेतली जात होती.

रशियाने या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. औद्योगिक सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे ही आग लागली का याचा देखील तपास केला जात आहे.

हा प्रकल्प जगातील सर्वात मोठ्या पॉलिथिलीन आणि पॉलीप्रॉपिलीन उत्पादक केंद्रांपैकी एक मानला जात आहे. पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर येथे दरवर्षी २३ लाख मेट्रिक टन पॉलिथिलीन आणि ४ लाख टन पॉलीप्रॉपिलीनचे उत्पादन अपेक्षित आहे.