
गेल्या काही दिवसांपासून शांत असलेला ‘ओंकार’ हत्ती पुन्हा एकदा खवळला आहे. त्याने महाराष्ट्र-गोवा सीमाभागात कहर माजवला असून, सीमाभागातील बागायतींचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले आहे. हत्तीने उभ्या असलेल्या एका कारवर हल्ला चढवून ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली. तर मोपा-तांबोसे परिसरात पिकांचीही नासधूस केली. ‘ओंकार’ने गोवा-पेडणे तालुक्यातील मोपा, तांबोसे आणि उगवे हैदोस घालून दोन तास मुख्य रस्ता रोखून धरला. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी लाखोंचे नुकसान झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चार महिन्यांनंतर मोपा-तांबोसे परिसरात एण्ट्री
सुमारे चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर ‘ओंकार’ने मोपा, तांबोसे आणि उगवे परिसरात पुन्हा प्रवेश केला आहे. सध्या गोवा वनविभागाचे 50 जवान हत्तीला हुसकावून लावण्यासाठी दिवस-रात्र पहारा देत आहेत. ‘ओंकार’ हत्तीच्या ’वनतारा’ येथील पुनर्वसनाचा प्रस्ताव रद्द झाल्याने हा हत्ती महाराष्ट्राचा असल्याचे सांगत राज्य सरकारनेच यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे. वारंवार होणाऱ्या या उपद्रवामुळे वन्यजीवांच्या दहशतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तत्काळ ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.





























































