
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी व धर्मवीर आनंद दिघे यांच्या २५ व्या पुण्यस्मरणार्थ ठाणे शहर व परिसरातील १ लाख जणांची विनामूल्य नेत्रतपासणी केली जाणार आहे. त्याशिवाय सरकारी योजनेचा लाभ मिळवू न शकणाऱ्या ५०० गरजू रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा निर्धारही केला आहे. धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान व श्री रामकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जाणार आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे व श्री रामकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टच्या नेत्रालयाचे संचालक डॉ. नितीन देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. डोळ्यांच्या पडद्याशी संबंधित आजार वाढत चालले असून गोरगरीबांना उपचार परवडत नाहीत. त्यांच्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत नेत्रतपासणी केली जाणार आहे.
कार्यशाळा, चर्चासत्र
मिशन नेत्रदूत ही केवळ चळवळ नव्हे तर त्यातून जनजागृती केली जाणार आहे. डोळ्यांशी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मार्गदर्शन शिबीरदेखील होणार असून विनामूल्य कार्यशाळा व चर्चासत्र याचे आयोजन केले जाणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभकाही रुग्णांना मिळत नाही. अशा रुग्णांच्या पाठीशी मिशन नेत्रदूत चळवळ ठाम उभी राहणार असून त्यांना सर्वतोपरी मोफत उपचार दिले जाणार असल्याची माहिती केदार दिघे व डॉ. नितीन देशपांडे यांनी दिली.



























































