
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात तुलना करून नवा वाद पेटवला होताच. परदेशात हिंदुस्थानसाठी सचिनपेक्षा विराटची कामगिरी सरस असल्याचे मत त्याने व्यक्त केले होते. आता त्याने आपल्या विधानावर कायम राहात परदेशात विराटने केलेल्या कामगिरीचे आणि त्याच्या फलंदाजीतील मानसिकतेचे कौतुक करत आपल्या वक्तव्याचा अर्थ आकडेवारीच्या तुलनेत काढू नका, अशा पद्धतीने आपल्या विधानाचा बचाव केला.
डिव्हिलियर्सने आपल्या यूटय़ूब चॅनलवरील व्हिडीओमध्ये म्हटले की, सचिन आणि विराटबाबत केलेल्या आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला. हे माझे वैयक्तिक मत आहे. मी कोणालाही कमी लेखत नाही. सचिन महान असला तरी विराटही भारी असल्याचे मत सांगून त्याने विराटशी असलेली मैत्री दाखवून दिली आहे.
सचिनने हिंदुस्थानी क्रिकेटला नवी दिशा दिली आणि जगभर सातत्याने धावा करण्यासाठी काय आवश्यक आहे, हे पुढच्या पिढीला दाखवून दिले. मात्र विराटने वेगवान गोलंदाजांच्या शॉर्ट बॉलचा सामना करण्याची क्षमता विकसित करून हिंदुस्थानी फलंदाजीला वेगळी ओळख दिली. आकडेवारी पाहिली तर विराट सचिनपेक्षा मागे आहे, पण मी नेहमी फक्त आकडे पाहत नाही, असे सांगत त्याने विराटच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि प्रभावाचा मुद्दा पुढे केला. विशेषतः 2014च्या इंग्लंड दौऱ्यातील अपयशानंतर विराटने केलेल्या जबरदस्त पुनरागमनाचा डिव्हिलियर्सने दाखला दिला. परदेशात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास, फिटनेस, आक्रमकता आणि संतुलित क्रिकेट विराटने दाखवून दिले. कोणाची कारकीर्द मोठी यापेक्षा पुढच्या पिढीवर कोणाचा प्रभाव अधिक आणि परदेशात यशस्वी होण्यासाठी कोणता आदर्श उभा राहिला, याला त्याने महत्त्व दिले आहे. त्यामुळे डिव्हिलियर्सचे वक्तव्य क्रिकेटचे वाद तापवणार हे निश्चित आहे.

























































