
उपनगरी रेल्वेच्या वेळापत्रकाचा रोजच बोजवारा उडत आहे. हार्बरची सेवा बुधवारी पक्ष्यामुळे कोलमडली होती. त्यापाठोपाठ गुरुवारी मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकात सिग्नल बिघडला आणि ऐन पिक अवर्सला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) दिशेने जाणाऱया लोकल गाडय़ांचा खोळंबा झाला. तब्बल 48 मिनिटे लोकल सेवा विस्कळीत राहिल्यामुळे नोकरदारांना कामावर पोहोचण्यास ‘लेटमार्क’ लागला. गुरुवारी सकाळी भांडुप स्थानकातील सीएसएमटीच्या दिशेचा सिग्नल सकाळी 7.47 वाजल्यापासून 8.35 वाजेपर्यंत नादुरुस्त राहिला. गाडय़ांना योग्य सिग्नल न मिळाल्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱया लोकल गाडय़ांची वाहतूक विस्कळीत झाली. सिग्नलमधील बिघाड दुरुस्त होईपर्यंत अप मार्गावरील सर्व लोकल ए/मार्करच्या आधारे पुढे सोडण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.




























































