लग्नाची वरात घेऊन जाणारी खासगी बस थेट खांबाला धडकून पलटली, 35 जखमी चार जण गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
केरळमधील कुथट्टुकुलमजवळ कक्कूर येथे लग्नसमारंभासाठी वऱ्हाडींना घेऊन जाणारी एक खासगी बस स्कुटीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात उलटून थेट पेट्रोल पंपावर धडकल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या भीषण अपघातात 35 जण जखमी झाले असून त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलाडीहून एलांजीकडे जाणारी ही बस एका स्कुटीचालकाला वाचवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली आणि पेट्रोल पंपावरील खांबावर आदळली. या थरारक घटनेत पेट्रोलपंपाजवळ असलेला स्कुटीचालक अवघ्या इंचभराच्या अंतराने थोडक्यात बचावला आणि बस पलटी झाल्यानंतरही जागेवरच उभा असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेला दुसरा स्कुटीस्वारही बालंबाल बचावला.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या चार गंभीर प्रवाशांना उपचारासाठी कुथट्टुकुलम येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतर जखमींनाही तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली आहे. या अपघातामुळे स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, कलाडी ते एलांजी प्रवास करणाऱ्या वऱ्हाडींचा लग्नाचा आनंद या दुर्दैवी घटनेमुळे विरघळून गेला.