शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी पाच हजार राख्या आणि पत्रे, लाडक्या बहिणी भाऊरायाकडून घेणार ‘व्यसनमुक्तीची’ ओवाळणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भैया मेरे राखी के बंधन को निभाना … असे म्हणत पेणमधील लाडक्या बहिणी भाऊरायाकडून व्यसनमुक्तीची ओवाळणी घेणार आहेत. शिक्षक दाम्पत्य मानकवळे यांनी ‘एक राखी व्यसनमुक्तीची’ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी पाच हजार राख्यांचे आणि व्यसनमुक्ती पत्राचे वाटप केले जाणार आहे.

मनोरमा मानकवळे, उदय मानकवळे या शिक्षक दाम्पत्याने ‘एक राखी व्यसनमुक्तीची’ या अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत तालुक्यातील शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेसमध्ये शिकणारे विद्यार्थी, पोलीस कर्मचारी तसेच महिला बचत गटांना सुमारे ५ हजार राख्यांचे व व्यसनमुक्ती पत्राचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी बहिणी आपल्या भाऊरायाकडून व्यसनमुक्त राहण्याचे वचन घेणार आहेत. मनोरमा यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस अधिकारी किशोर घरत यांच्या मनगटावर एक राखी व्यसनमुक्तीची बांधून या अभियानाचा शुभारंभ केला.

पेणमधील दाम्पत्याचा अनोखा उपक्रम, सकारात्मक प्रतिसाद

सध्या ओटीटीवरील चित्रपट, सिरीयल तसेच समाजमाध्यमांमध्ये व्यसनांचे प्रोत्साहनात्मक चित्रीकरण करण्यात येत असल्यामुळे तरुण पिढी व्यसनाकडे आकर्षित होत आहे. त्यांना या व्यसनांपासून दूर ठेवण्याकरिता आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमाला युवा पिढीकडून अतिशय उत्तम व सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया उदय मानकवळे यांनी दिली.