राज्यात वैद्यकीय एमबीबीएस व बीडीएसच्या 10,509 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे पहिली यादी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रवेशासाठी एमबीबीएस व बीडीएस (बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी) पदवी अभ्यासक्रमाच्या राज्याच्या कोटयांतर्गत पेंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत दोन्ही अभ्यासक्रमाच्या 10 हजार 646 जागांपैकी 10 हजार 509 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी) ही यादी घोषित केली आहे.

पहिल्या यादीत एमबीबीएसच्या 8 हजार 129 जागांपैकी 8 हजार 065 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. तर बीडीएसच्या 2 हजार 517 जागांपैकी 2 हजार 444 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. एमबीबीएसच्या दिव्यांग व अनाथ संवर्गातील 64 जागा रिक्त राहिल्या आहेत. तर बीडीएसच्या जागांमध्ये दिव्यांग व अनाथ संवर्गातील 73 जागा रिक्त राहिल्या आहेत.

पहिल्या फेरीत महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी 31 ऑगस्ट 2026 ते 4 सप्टेंबर 2026 सायंकाळी  5.30 पर्यंत आवश्यक ती मूळ कागदपत्रे व आवश्यक शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह वाटप झालेल्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.