डीजेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची गोल गोल वाणी, पुणेकरांच्या तीव्र रोषानंतरही बंदी की परवानगी याबाबत स्पष्टता नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात गणेशोत्सवातील कर्णकर्कश डीजेविरोधात नागरिकांचा रोष तीव्र झाला असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संवेदनशील प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेण्याचे टाळले. डीजेवर बंदी घालणार की मंडळांना परवानगी देणार यावर ठोस उत्तरे न देता त्यांनी डीजेच्या वादात न अडकता सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव कसा साजरा करावा हे पुणेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यावे, असे गोल गोल आवाहन केले.

पुण्यात झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, पुणे हे विद्येचे आणि संस्पृतीचे माहेरघर आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले, तो वारसा जपत डीजेच्या वादात न अडकता पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव कसा साजरा करावा, हे पुणेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यावे. मात्र, डीजेच्या वापराबाबत सरकार आणि पोलिसांचे नेमके धोरण काय असेल, हे त्यांनी सांगितले नाही.

पुण्यातील डीजे वाद नेमका काय आहे? 

गेल्या काही वर्षांपासून पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर बीम आणि प्रचंड आवाजाच्या डीजे-डॉल्बी सिस्टममुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कर्णकर्कश डीजे, डॉल्बी आणि प्रचंड क्षमतेच्या ध्वनिवर्धकांविरोधात गुडलक चौकात आंदोलन करून सार्वजनिक उत्सवांमध्ये डीजेवर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी केली. विसर्जन मिरवणुकीच्या काळात काही नागरिकांना दोन-तीन दिवस शहराबाहेर जावे लागते, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनात व्यक्त करण्यात आली.