
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानची लक्तरे वेशीवर टांगली गेली असतानाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) संघातच उलथापालथ केली आहे. मालिकेतील दोन सामने गमावल्यानंतर दोन प्रशिक्षकांची हकालपट्टी आणि तब्बल सात खेळाडूंना मायदेशी परत पाठविण्याच्या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, अखेरच्या कसोटीसाठी माईक हेसन यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मालिकेतील केवळ एक सामना शिल्लक असताना असा बदल करून काय साध्य होणार अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा डावाने आणि 103 धावांनी, तर दुसऱ्या कसोटीत 194 धावांनी पराभव झाला. त्यानंतर पीसीबीने टी-20 संघाचा कर्णधार सलमान अली आगा, माजी कर्णधार मोहम्मद रिझवान आणि फलंदाज इमाम-उल-हक यांच्यासह सात खेळाडूंना मायदेशी पाठवले. बर्मिंगहॅम येथे 9 सप्टेंबरपासून होणाऱ्या मालिकेतील अखेरच्या कसोटीसाठी युवा आणि अनुभवहीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांनाही पदावरून हटवण्यात आले आहे.
मिकी आर्थरचा पीसीबीला आरसा
पाकिस्तानचे माजी विदेशी मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी पीसीबीच्या निर्णयाची जोरदार खिल्ली उडवली. ‘हा निर्णय हास्यास्पद आहे,’ असे म्हणत त्यांनी बोर्डाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
माजी पाकिस्तानी क्रिकेटरही पीसीबीवर बरसले
माजी कर्णधार जावेद मियांदाद यांनीही पीसीबीच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. मालिकेच्या मध्यावर खेळाडूंना मायदेशी पाठवणे हा त्यांच्यासाठी मानसिक धक्का असून त्यांच्या कारकीर्दीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असे मियांदाद यांनी म्हटले. माजी कर्णधार राशिद लतीफ यांनी तर बाबर आझमने पीसीबीच्या निर्णयाच्या निषेधार्थ कर्णधारपदाचा राजीनामा द्यायला हवा होता, असे म्हटले.
मिसबाह–उल–हकचा तडकाफडकी राजीनामा
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य मिसबाह-उल-हक यांनी निवड समितीच्या पदाचा राजीनामा दिला आहे. बोर्डाला ई-मेलद्वारे त्यांनी राजीनामा पाठवला असून, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) अद्याप तो स्वीकारलेला नाही. मिसबाह यांनी लाहोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील फलंदाजी सल्लागारपद सोडण्याचाही निर्णय घेतला आहे.





























































