कश्मिरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश, यूस्मार्गमधील चकमकीत लश्कर-ए-तोयबाचा पाकिस्तानी कमांडर यासिर ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू आणि काश्मिरमधील यूस्मार्ग परिसरात सुरक्षा दलांसोबत झालेल्या एका चकमकीत लश्कर-ए-तोयबाचा पाकिस्तानी कमांडर यासिर याचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणांना मोठे यश आले आहे. यासिर हा यापूर्वी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार सुलेमान मुसा याच्या गटात सक्रिय होता. पण गेल्या वर्षी दाचीगाममध्ये सुलेमान मुसा मारला गेल्यानंतर सुमारे वर्षभरापूर्वी यासिर या गटापासून विलग झाला होता. त्यानंतर तो स्वतंत्रपणे कार्यरत राहून यूस्मार्ग परिसरात लश्कर-ए-तोयबाचा प्रमुख कमांडर म्हणून सक्रिय झाला होता.

सुरक्षा दल बऱ्याच काळापासून यासिरच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते. शनिवारी यूस्मार्ग भागात सुरक्षा दल आणि यासिर आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूंकडून जोरदार गोळीबार झाला. या चकमकीत सुरक्षा दलांनी यासिरला कंठस्नान घातले. जम्मू आणि कश्मिरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी धडक मोहिमेचाच हा एक भाग आहे. या चकमकीनंतर सुरक्षा यंत्रणा आता यासिरचे नेटवर्क, लश्कर-ए-तोयबाच्या इतर दहशतवाद्यांशी असलेले त्याचे संबंध आणि हालिया दहशतवादी कारवायांच्या नियोजनातील त्याच्या सहभागाची कसून चौकशी करत आहेत.

दरम्यान, मध्य कश्मिरमधील बडगाम जिल्ह्यात हिंदुस्थानी लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे मोठी मोहीम राबवली होती. पूंछमधील असदर गल्लीपासून यूस्मार्गे पुलवामातील पाखेरपोराच्या दिशेने संशयित दहशतवाद्यांचा एक गट जात असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. पीर पंजाल पर्वतरांगेतील उंच खिंडींमधून या गटाच्या हालचालींवर पाळत ठेवल्यानंतर 1 सप्टेंबर रोजी संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला. 3 सप्टेंबर रोजी असदर गल्लीत दहशतवाद्यांशी थेट संपर्क आला होता.