
केतन अग्रवाल खूनप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी चेतन चौधरीचा वर्गमित्र रितेश हंगे याला अटक केली. केतनच्या हत्येच्या कटाची त्याला पूर्वकल्पना होती तसेच कटात त्याचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. रितेशला न्यायालयात हजर केले असता १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
केतन अग्रवाल याची १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान चेतनच्या मोबाइलमधून पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली. चेतन आणि सिया यांनी हत्येशी संबंधित काही चॅट डिलीट केल्या होत्या. पोलिसांनी या चॅट रिकव्हर केल्यानंतर चेतन आणि रितेश यांच्यात हत्येबाबत चर्चा झाल्याचे समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
























































