काटे खोलवर रुतले, तरी पाऊल पुढे टाकतो आहे! धनंजय मुंडेंच्या वर्कआऊट व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंत्रीपद गमावल्यानंतर अडगळीत पडलेले अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे हे पुन्हा चर्चेत आले आहेत. ‘सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालंय, पण येणारा काळ आपलाच आहे आणि चमत्कार दाखवावा लागेलच’ असं सूचक विधान केल्यानंतर आता ‘काटे खोलवर रुतले, तरी पाऊल पुढे टाकतो आहे,’ असे म्हणत त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने या व्हिडीओची आणि कॅप्शनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

धनंजय मुंडे यांनी जीममध्ये वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मुंडे यांनी काही काव्यपंक्ती लिहिल्या आहेत. ‘काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे… भेगाळलेले पाय आणि घायाळ मन अजूनही धैर्य टिकवून आहे… निंदा-दूषणे आता न भिडती, अडखळत मार्ग काढतोच आहे… हरवण्याची आता बिशाद कुणाची, स्वतःशी सुद्धा लढतो आहे…’ अशा काव्यपंक्ती लिहीत धनंजय मुंडे यांनी वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया फेसबुक अकाउंटवरून जीमममध्ये वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.