नागोठण्याच्या फ्लायओव्हरला काचपट्टी; ठेकेदाराचे हे कुठले इंजिनिअरिंग, सुरक्षेच्या नावाखाली थुकपट्टी, प्रवाशांमध्ये संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठण्याच्या कुप्रसिद्ध फ्लायओव्हरवर बांधकाम खात्याचा थुकपट्टी कारभार समोर आला आहे. उद्घाटनानंतर अवघ्या दोनच महिन्यांत संरक्षक भिंतीला भल्यामोठ्या भेगा पडल्याने हा फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. मात्र धोकादायक झालेल्या या फ्लायओव्हरची मजबूत डागडुजी करण्याऐवजी हे पाप झाकण्यासाठी या तड्यांवर चक्क एमसील लावून त्यावर काचपट्ट्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे ठेकेदाराचे हे इंजिनिअरिंग तरी कुठले, असा सवाल वाहनचालकांसह प्रवासी विचारत असून एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर सरकारचे डोळे उघडतील का, असा संताप व्यक्त होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ लटकले आहे. सरकार पनवेलपासून पोलादपूरपर्यंत या मार्गाचे काम बहुतांशी झाले असे सांगत असले तरी नागोठणे, कोलेटी, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव या भागांत लहानमोठ्या पुलांची कामे रखडली आहेत. अनेक ठिकाणी नव्याने तयार केलेले काँक्रीटचे रस्ते फाटल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यातच आता नागोठण्याच्या मुरावाडी ते इंद्रप्रस्थ हॉटेल या पुलाच्या संरक्षक भिंतीला धोकादायक बाक आले असून भिंतीच्या सिमेंट ब्लॉकला भेगा पडल्या आहेत. निकृष्ट कामामुळे पावसाळ्यात पाणी झिरपून हा फ्लायओव्हरच ढासळण्याची भीती असल्याने दोनच महिन्यांत हा फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आता कंत्राटदाराने या पुलाची योग्य पद्धतीने डागडुजी करण्याऐवजी भेगा पडलेल्या सिमेंटच्या ब्लॉकच्या मधे एमसील लावून काचपट्टी लावण्याचा उद्योग केला आहे.

दुर्घटना घडल्यास हाहाकार उडेल
हा संपूर्ण फ्लायओव्हर मातीच्या भरावाने भरला असून त्याची उंची जवळपास २५ फुटापर्यंत आहे. गणेशोत्सव तोंडावर असल्याने या फ्लायओव्हरच्या बाजूने असलेल्या सर्व्हिस रोडवरून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची रहदारी वाढणार आहे. या दरम्यान संरक्षक भिंत ढासळल्यास अनेक गाड्या मलब्याखाली गाडल्या जाऊन हाहाकार उडण्याची भीती आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतर सरकारला जाग येईल का, असा संताप शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नागोठणे विभागप्रमुख प्रकाश मेस्त्री यांनी केला आहे.

आता हसावे की रडावे?
भेगा पडलेला हा फ्लायओव्हर धोकादायक झाला आहे का हे तपासण्यासाठी कंत्राटदाराने चक्क तडे गेलेल्या ठिकाणी काचपट्टी तर काही ठिकाणी खुंट्या ठोकल्या आहेत. काचपट्ट्यांना तडा केल्यास हा फ्लायओव्हर कोसळू शकतो, असा तर्क यामागे असल्याचे बोलले जात आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ठेकेदाराचा हा अजबगजब कारभार पाहून आता हसावे की रडावे, अशी अवस्था सर्वांची झाली आहे.