
स्मार्ट मीटरची सक्ती आणि अवाजवी वीज बिलांच्या निषेधार्थ गुरुवारी डहाणूच्या चारोटी नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर केलेल्या या आंदोलनात जव्हार, शहापूर, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी, डहाणूसह पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी, कामगार तसेच महिला सहभागी झाल्या होत्या. भरपावसातही आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या मांडून सरकार व महावितरणविरोधात जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. रास्ता रोकोमुळे मुंबई व गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाकपच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.






























































