सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापुरातील विमानसेवा नियमित आणि कायमस्वरूपी सुरू राहावी, यासाठी ‘सोलापूर विकास मंच’च्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. याच मालिकेचा एक भाग म्हणून शिष्टमंडळाने होटगी रोड विमानतळावर एअरपोर्ट डायरेक्टर माधवराव सोनकुसले यांची भेट घेऊन मुंबई, गोवा, हैदराबाद व तिरुपती या मार्गांवर पूर्ववत विमानसेवा सुरू करण्याबाबत लेखी निवेदन दिले.

सोलापूरचा वाढता औद्योगिक विकास, व्यापार आणि धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता, योग्य वेळापत्रकानुसार आणि नियमित स्वरूपात विमानसेवा सुरू राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे शिष्टमंडळाने यावेळी स्पष्ट केले.

भेटीदरम्यान विमानसेवेत येणाऱ्या नेमक्या तांत्रिक अडचणी आणि त्यावर वरावयाच्या उपायांवर संचालक माधवराव सोनकुसले यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. विकास मंचाच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना संचालकांनी समाधानकारक उत्तरे दिली. यामुळे सोलापुरातून लवकरच नागरी विमानसेवा पुन्हा सुरू होईल आणि यावेळी ती विनाखंड चालू राहील, असा विश्वास विकास मंचाच्या सदस्यांनी व्यक्त केला.

विमानसेकेच्या पुनर्पालनासाठी मंच सर्व स्तरांवर प्रयत्नशील असून, अवघ्या तीन दिवसांपूर्वीच या शिष्टमंडळाने सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली होती.

या शिष्टमंडळात ‘सोलापूर विकास मंच’चे प्रमुख सदस्य केतनभाई शहा, मिलिंद भोसले, मनोज क्षीरसागर आणि योगीन गुर्जर सहभागी होते. सोलापूरचा औद्योगिक आणि सर्वांगीण विकास साधून शहराला गतवैभव मिळवून देण्यासाठी सोलापूर विकास मंच कटिबद्ध असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.