क्रिकेटनंतर आता टीव्हीवर ‘हिटमॅन’चा जलवा; रोहित शर्मा करणार ‘फॅमिली फुल हाउस’चे सूत्रसंचालन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी क्रिकेटपटू रोहित शर्माचा नवीन टीव्ही शो ‘फॅमिली फुल हाउस विथ रोहित शर्मा’ 19 सप्टेंबरपासून सोनी टीव्हीवर सुरू झाला आहे. हा शो अमेरिकन प्रसिद्ध गेम शो फॅमिली फ्यूडवर आधारित आहे. ज्यामध्ये देशभरातील लोकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे स्पर्धकांना द्यावी लागतात. या शोद्वारे रोहित शर्माने टेलिव्हिजन विश्वात सूत्रसंचालक (होस्ट) म्हणून पदार्पण केले आहे.

पहिल्या एपिसोडमध्ये रोहितचे खास मित्र आणि क्रिकेटपटू श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, अभिषेक नायर सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत चित्रपट क्षेत्रातील कुणाल खेमू, दिनेश लाल यादव, स्पर्श श्रीवास्तव आणि वंशिका धीर यांनी हजेरी लावली होती. या शोमध्ये सिंगल, डबल, ट्रिपल पॉईंट, फुल हाउस आणि जॅकपॉट असे चार मुख्य राऊंड आहेत.

गेली 19 वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणाऱ्या रोहित शर्माने सूत्रसंचालनाचा कोणताही अनुभव नसतानाही पहिल्याच एपिसोडमध्ये उत्तम कामगिरी केली. रोहीतची मुंबैया स्टाइल, क्रिकेटपटू आणि कलाकारांसोबतची हलकीफुलकी जुगलबंदी तसेच शहरी बाबू गाण्यावर बनवलेली रील रीक्रिएट करण्याचा प्रयत्न प्रेक्षकांना खूपच आवडला. विशेष म्हणजे, रोहितने 19 सप्टेंबर 2007 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि योगायोगाने 19 सप्टेंबर रोजीच त्याचा हा पहिला टीव्ही शो रिलिज झाला आहे. पुढील एपिसोडमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये दिसणार आहेत.