
गेल्या ४५ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी त्रस्त असताना आज हताश झालेल्या अर्धापूर तालुक्यातील एका शेतकर्याने आपल्या अडीच एकर शेतातील सोयाबीन पेटवून दिले. आणि त्याला हंबरडा फुटला.
नांदेड जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणात दिसून येत असून, अर्धापूर आणि हिमायतनगर तालुक्यातील काही शेतकर्यांनी चार दिवसापूर्वीच सोयाबीन उपटून फेकून दिले. पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन पीक ७० टक्के करपले असून, नगदीचे पिक म्हणून बहुतांश शेतकर्यांनी सोयाबीनला पसंती दिली. मात्र पाऊस नसल्याने या सोयाबीनच्या पिकाचा चिपाडा झाला आहे. सोयाबीन उगवले मात्र पाऊस नसल्याने शेंगा भरल्या नाहीत. अनेक शिवारात सोयाबीनचे पीक करपून गेले आहे.
अशाच अवस्थेत हताश झालेल्या अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील वैजनाथ सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी जयश्री सूर्यवंशी या शेतकरी दांपत्याने करपलेल्या सोयाबीनच्या पिकाला हताश होऊन काडी लावून हे पिक पेटवून दिले. संपूर्ण अडीच एकर शेतात त्यांनी सोयाबीन लावले होते. मशागतीचा खर्च प्रति ऐकरी ४० हजार रुपये आला, त्याची मशागत व खते टाकून मोठ्या कष्टाने या पिकाची निगराणी केली. मात्र पाण्याची कुठलीही सोय नाही. आणि वरुण राजाने अवकृपा केली. त्यामुळे हे पीक भरलेच नाही. शेंगा आहेत, मात्र त्यात दाणाच भरला नसल्याने हे शेतकरी अस्वस्थ होते. आज सकाळी ११ वाजता आपल्या शेतात जाऊन वैजनाथ सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी जयश्री सूर्यवंशी यांनी अक्षरशः या पिकाला काडी लावून ते पिक पेटवून दिले. यावेळी त्यांनी हंबरडाच फोडला. यावेळी बोलताना वैजनाथ आणि त्यांची पत्नी जयश्री यांनी सांगितले की, कधी नाही ते एवढा मोठा दुष्काळ यावर्षी पडला आहे. किमान यावर्षी तरी वेळेवर पीक येईल असे आम्हाला वाटत होते. आम्ही आनंदातही होतो, मात्र गेल्या ४५ दिवसांपासून ओढ दिली. त्यात पूर्णतः सोयाबीन करपून गेले आहे. त्यामुळे हताश होवून आम्ही आज आमचे पीक जाळून टाकले आहे. माय-बाप सरकारने तात्काळ आम्हाला मदत देवून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी पुढे यावे, अशी याचनाही त्यांनी केली.



























































