कमी वयातच वाढतोय ‘मेटाबॉलिक सिंड्रोम’चा धोका? मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे काय? जाणून घ्या…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातच आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘मेटाबॉलिक सिंड्रोम’ मेटाबॉलिक सिंड्रोम हा कोणताही एक स्वतंत्र आजार नाही, तर शरीरात एकाच वेळी उद्भवणाऱ्या काही आरोग्यासंबंधी समस्यांचा समूह आहे. पोटाभोवती अतिरिक्त चरबी साचणे, ब्लड शुगर वाढणे, उच्च रक्तदाब, ट्रायग्लिसराइड्स वाढणे किंवा चांगले कोलेस्ट्रॉल कमी होणे जर यापैकी किमान ३ समस्या एखाद्या व्यक्तीमध्ये एकत्र आढळल्या, तर त्याला ‘मेटाबॉलिक सिंड्रोम’ म्हटले जाते. यामुळे पुढे जाऊन डायबिटीज, हृदयाचे आजार आणि स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.

मेटाबॉलिक सिंड्रोमची लक्षणे

पोट आणि कंबर वाढणे – जर तुमचे वजन विशेषतः पोटाच्या आसपास वाढत असेल, तर हे शरीरात इन्सुलिन योग्य प्रकारे काम करत नसल्याचे लक्षण असू शकते.

अतिशय तहान लागणे – रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यावर शरीराला जास्त पाण्याची गरज भासते, ज्यामुळे वारंवार तहान लागते.

वारंवार लघवी होणे – रक्तातील अतिरिक्त साखर लघवीवाटे बाहेर काढण्याचा प्रयत्न शरीर करत असते.

सतत थकवा जाणवणे – ब्लड शुगर वाढल्यामुळे शरीर साखरेचा योग्य वापर ऊर्जेसाठी करू शकत नाही, ज्यामुळे सतत अशक्तपणा किंवा ऊर्जेची कमतरता जाणवते.

दृष्टी अस्पष्ट होणे – रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास काही काळासाठी दृष्टी अस्पष्ट होऊ शकते.

त्वचेच्या रंगात बदल – मान किंवा काखेतील त्वचा काळी आणि जाड होणे. हे लक्षण ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’शी जोडलेले असते.

रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलमध्ये बदल – उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉलच्या पातळीत बदल झाल्यास बऱ्याचदा कोणतीही बाह्य लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे व्यक्ती निरोगी वाटत असली तरीही रिपोर्टमध्ये समस्या निघू शकते.

काय काळजी घ्यावी?

  • जर तुम्हाला वरीलपैकी कोणतेही लक्षण दिसत असेल किंवा तुम्हाला आधीपासूनच उच्च रक्तदाब, साखर अथवा पोटावर जास्त चरबी असेल, तर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि कंबरेचा घेर नियमित तपासून घेणे गरजेचे आहे.
  • वेळीच निदान झाल्यास योग्य आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या उपचारांनी पुढील गंभीर धोके टाळता येऊ शकतात.