शरीरातील फायबर वाढवण्यासाठी आहारात या फळांचा समावेश करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजकाल लोक प्रथिनांवर खूप लक्ष देतात. जिममध्ये जाणारे लोक प्रोटीन डाएट घेतात. परंतु, हाय-प्रोटीनच्या नादात लोक फायबरकडे दुर्लक्ष करतात. फायबरच्या या कमतरतेमुळे केवळ बद्धकोष्ठता ,पोटात गॅस, पोट फुगणे आणि वारंवार भूक लागणे यांसारख्या समस्याच उद्भवत नाहीत, तर दीर्घकाळात हाय कोलेस्ट्रॉल, हृदयाचे आजार आणि कोलन कॅन्सरचा धोकाही वाढतो. ICMR-NIN नुसार, प्रौढ महिलांनी रोज सुमारे 25 ग्रॅम आणि पुरुषांनी रोज सुमारे 30 ग्रॅम फायबर घेतले पाहिजे. फायबर शरीरात पूर्णपणे पचत नाही, पण आतड्यांच्या सुरळीत कार्यात याची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे तुमच्या दैनंदिन आहारात फायबरने भरपूर असलेल्या या फळांचा समावेश केला पाहिजे:

संत्रे – संत्र्यातून व्हिटॅमिन सी सोबतच भरपूर फायबर मिळते. तुम्हाला फायबरचे प्रमाण वाढवायचे असेल, तर संत्र्याचा रस पिण्याऐवजी अख्खे संत्रे खाणे हा उत्तम पर्याय आहे. फळाच्या गरामध्ये फायबर असते, जे ज्यूस बनवताना कमी होऊ शकते.

केळी – आहारात फायबर वाढवण्याचा केळी हा सर्वात सोपा आणि खिशाला परवडणारा मार्ग आहे. सकाळी नाश्त्यामध्ये ओट्स किंवा दह्यासोबत केळी खाऊ शकता किंवा ऑफिसला जाताना स्नॅक म्हणून सोबत नेऊ शकता.

पपई – पपई फायबरसोबतच अनेक आवश्यक पोषक घटक पुरवते. यामध्ये पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाइम असते. जे प्रोटीन पचवण्याच्या प्रक्रियेत मदत करते. पपई कापून तशीच खा किंवा त्यावर थोडे काळे मीठ टाकून खाल्ल्यास पपईची चव आणखी वाढते.

पेरू – पेरू हा फायबरने समृद्ध आणि सहज मिळणारा फळ आहे. पेरूमध्ये फायबरसोबतच थोड्या प्रमाणात प्रोटीनही मिळते.

सफरचंद – सफरचंद हे कुठेही सहज सोबत नेण्यासारखे स्नॅक आहे. चांगल्या प्रकारे धुऊन सालींसकट सफरचंद खाणे फायबरसाठी अधिक फायदेशीर ठरते. सफरचंद दही, ओट्स किंवा सॅलडमध्ये मिसळूनही खाता येते.

  • दैनंदिन फायबरची गरज पूर्ण करण्यासाठी फक्त फळे खाणे पुरेसे नाही. तुमच्या आहारात डाळी, चणे, राजमा, भाज्या, धान्ये आणि बिया यांचाही समावेश करा. तसेच, आहारात फायबरचे प्रमाण अचानक वाढवण्याऐवजी हळूहळू वाढवा आणि पुरेसे पाणी प्या.