बँकेच्या आरटीजीएस प्रणालीत फेरफार करून फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका सरकारी बँकेच्या आरटीजीएस प्रणालीत फेरफार करून 13.96 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अटक केली. मेहुल सिमरिया असे अटक आरोपीचे नाव आहे. आरटीजीएस प्रक्रियेत फेरफार करून देशातील विविध बँक खात्यांमध्ये अनधिकृतपणे रक्कम हस्तांतरित केल्याचे तपासात समोर आले आहे.

महाराष्ट्र सायबरकडे काही दिवसांपूर्वी एक तक्रार आली होती. आरटीजीएस प्रणालीमध्ये फेरफार करून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पेमेंट प्रक्रिया प्रणालीकडे अनधिकृत पेमेंट संदेश पाठवण्यात आले. 187 अनधिकृत व्यवहारांमुळे 13.96 कोटी रुपयांची फसवणूक झाली. अवघ्या तीन दिवसांत पैसे 36 वेगवेगळय़ा बँकांमधील 107 खात्यांत ट्रान्सफर करण्यात आले. त्या तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र सायबरने गुन्हा नोंद केला.

तपासादरम्यान महाराष्ट्र सायबरने बँकेच्या सर्व्हर पायाभूत सुविधांची सविस्तर तपासणी केली. सर्व्हर लॉग, व्यवहाराच्या नोंदी, प्रणालीमधील नोंदी याचे विश्लेषण करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण करत असताना एका खातेदाराची ओळख पटली. त्यावरून पोलिसांनी मेहुल सिमरियाला ताब्यात घेऊन अटक केली.