मेळघाटात दुर्मिळ ‘फॉरेस्ट इगल आऊल’; मध्य हिंदुस्थानातील दुसरी नोंद; पेंचनंतर आता मेळघाटमध्ये दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आकाराने 50 ते 65 सेंटिमीटर लांब, पिवळी चोच, डोक्यावर पिसांचे तुरे आणि पांढऱया रंगाच्या पोटावर गडद काळे ठिपके व पट्ट्यांमुळे कुणाचेही लक्ष्य वेधणाऱ्या ‘फॉरेस्ट इगल आऊल’ने अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या जैवविविधतेत भर घातली आहे. सावजाची वेगवान शिकार करणारा हा शिकारी पक्षी घुबडांमध्ये उजवा मानला जातो. आकाराने तुलनेने मोठा असून मध्य हिंदुस्थानातील या प्रजातीची ही दुसरी नोंद ठरली आहे.

मेळघाट प्रकल्पांतर्गत सीपना वन्यजीव क्षेत्रातील सेमाडोह परिसरात स्पॉट-बेलीड ईगल आऊल अर्थात ठिपकेदार पोटाचे घुबड या दुर्मिळ पक्ष्याची प्रथमच नोंद करण्यात आली आहे. या पक्ष्याचे शास्त्रीय नाव ‘फॉरेस्ट इगल आऊल’ आहे. या परिसरात घुबडांच्या 13 प्रजाती सापडतात. यापूर्वी मध्य हिंदुस्थानात या घुबडाची सर्वप्रथम नोंद पेंच व्याघ्र प्रकल्प परिसरात झाली होती. सेमाडोह येथील पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्थानिक निसर्ग मार्गदर्शकांनी (गाईड्स) या दुर्मिळ पक्ष्याची नोंद केली आहे. यामध्ये भोला बाबू मावस्कर, अविनाश एच. मसराम, अशोक एस. मावस्कर आणि अक्षय भोला मावस्कर यांचा समावेश आहे.