
लक्ष्य सेनने आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवत कुमामोतो मास्टर्स जपान बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. रोमांचक झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हिंदुस्थानच्या या स्टार शटलरने इंडोनेशियाच्या जागतिक क्रमवारीत १० व्या क्रमांकावर असलेल्या अल्वी फरहानचा तीन गेममध्ये २१-१२, १५-२१, २१-११ असा पराभव केला. लक्ष्य सलग दुसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.
पहिल्या गेममध्ये दमदार खेळ
लक्ष्यने सामन्याच्या सुरुवातीपासूनच दमदार रणनीती दाखवली. फरहानच्या वेगवान आणि आक्रमक खेळासमोर, लक्ष्यने संयम दाखवत, संयमी रॅली रचल्या आणि योग्य संधीची वाट पाहिली. अचूक रिटर्न्स आणि नेमक्या फोरहँड फटक्यांच्या जोरावर लक्ष्यने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि पहिला गेम २१-१२ ने सहज जिंकला. मागील दोन्ही सामन्यांमध्ये लक्ष्यने फरहानविरुद्ध एकही गेम जिंकला नव्हता, पण यावेळी त्याने शानदार पुनरागमन केले आणि आपल्या रणनीतीने प्रतिस्पध्र्याला आश्चर्यचकीत केले.
इंडोनेशियन खेळाडूचे पुनरागमन
इंडोनेशियन खेळाडूने दुसऱ्या गेममध्ये जोरदार पुनरागमन केले. या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये लांब आणि रोमांचक रॅलीज पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये ५७-शॉटच्या मॅरेथॉन रॅलींचा समावेश होता. यामध्ये लक्ष्यच्या उत्कृष्ट बचावाने प्रेक्षकांची मने जिंकली. पण या काळात लक्ष्यकडून काही चुका झाल्या आणि त्याने अनेक गुण गमावले, ज्याचा फायदा घेत फरहानने २१-१५ने गेम जिंकला आणि सामना निर्णायक तिसऱ्या गेममध्ये नेला. तिसऱ्या गेममध्ये लक्ष्यने आक्रमक खेळ करत २१-११ असा विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला.

























































