3 किमीसाठी 14 कोटींचा खर्च; महिन्याभरात झाली रस्त्याची दुरवस्था, सत्ताधारी आमदारानेच वेधले लक्ष

महायुती सरकारच्या काळात रस्ते घोटाळे मोठय़ा प्रमाणात होत आहेत. अकोल्यातील पारस येथील औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या सीएसआरमधून बांधण्यात आलेल्या तीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी 14 कोटी रुपये खर्च दाखवण्यात आल्याची बाब सत्ताधारी आमदारानेच विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे उघडकीस आणली.

एक किलोमीटरचा डांबरी रस्ता बनवण्यासाठी साधारणपणे 40 लाख रुपये खर्च येत असताना तीन किलोमीटरच्या रस्त्यावर विद्युत केंद्राचे अधिकारी आणि कंत्राटदार यांनी संगनमताने 14 कोटी रुपयांचा खर्च दाखवून 10 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. संबंधित अधिकाऱयाला तातडीने निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

सरकारने आतापर्यंत कंत्राटदाराला 7.15 कोटी रुपये अदा केले आहेत. आश्चर्य म्हणजे बांधकामानंतर अवघ्या महिनाभरात या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.